देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदी.

24 प्राईम न्यूज 4 Dec 2024. -मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज सकाळी १० वाजता विधान भवनात होत आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी भाजपचे । नवनिर्वाचित आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीत भाजपचे निरीक्षक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी सहभागी होतील. या बैठकीत भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड होणार आहे. भाजपचा विधिमंडळ गटनेता म्हणजेच महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले जाईल. या बैठकीनंतर महायुतीकडून राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करण्यात येईल. राज्यपालांकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, भाजपचे दोन्ही निरीक्षक एकनाथ शिंदे आणि अजितदादांची भेट घेणार आहेत.विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळाल्याने भाजपने महायुती सरकारचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्याचे ठरवले असून या सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे.