शरद पवार दिल्ली साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष

24 प्राईम न्यूज 3 Dec 2024.
दिल्लीत होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निवड करण्यात आल्याची माहिती सोमवारी सरहद संस्थेचे संजय नहार यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, संयोजन समितीचे डॉ. सतीश देसाई आणि सरहद संस्थेचे शैलेश पगारिया उपस्थित होते. सरहद संस्थेने या साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. तब्बल ७ दशकांनी देशाच्या राजधानीत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे संमेलन होत आहे. २१, २२, २३ फेब्रुवारी २०२५ या काळात दिल्लीतील तालकटोरा मैदानावर हे मराठी साहित्य संमेलन होणार आहे. शरद पवार यांनी औरंगाबाद (२००४), नाशिक (२००५), चिपळूण (२०१३) आणि सासवड (२०१४) अशा चार वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आहे, परंतु यंदा प्रथमच त्यांना स्वागताध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे.