नाराज छगन भुजबळांचा बंडाचा इशारा…

। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. होय मी नाराज आहे, मंत्रीपदापमुळे नाही, तर मला ज्या पद्धतीची वागणूक दिली, अपमानित केले, त्यामुळे मी दुःखी आहे. अजित पवारांशी बोलण्याची मला आवश्यकता नाही. जहाँ नही चैना, वहाँ नही रहेना, असे म्हणत भुजबळ यांनी कार्यकर्ते, समता परिषदेशी बोलून पुढील भूमिका निश्चित करणार असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर अधिवेशनासाठी नागपूरला जाणार नसल्याचे सांगत भुजबळांनी बंडाचा इशाराही दिला.होय, मी नाराज आहे. जेव्हा राज्यसभेची खासदारकी मागितली तेव्हा दिली नाही. आता निवडून आलो तर ७-८ दिवसांपूर्वी मला राज्यसभेवर जाण्याविषयी सांगितले. मी काय कुणाच्या हातचे खेळणे आहे काय? तसे केल्यास ती माझ्या मतदारांबरोबर प्रतारणा ठरेल. मी सात वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. मी विरोधी पक्षनेता राहिलेलो आहे. मंत्रीपदामुळे मी नाराज नाही, पण मला ज्या पद्धतीची वागणूक दिली गेली त्यामुळे मी दुःखी आहे. मला मंत्रिमंडळात न घेतल्यामुळे राज्यातील ओबीसी समाज आणि मतदारसंघातील जनता फार क्रोधित झाली आहे. मंत्रीपद किती वेळा आले आणि गेले तरी छगन भुजबळ संपला नाही. जरांगेंना अंगावर घेतल्याचे बक्षीस मला मिळाले. अजित पवारांशी बोलण्याची मला गरज वाटत नाही. मी माझ्या मतदारांशी बोलून पुढे काय करायचे ते ठरवेन, पण एक आहे जहाँ नहीं चैना, वहा नहीं रहना.
