अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता..

24 प्राईम न्यूज 20 Dec 2024.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लागली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत माहिती दिली. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होईल तसेच या योजनेसाठी कोणतेही नवे निकष लावण्यात आलेले नाहीत. तेव्हा कोणीही कसलीही शंका मनात ठेवू नये, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आम्ही जी आश्वासने दिली, ज्या योजना सुरू केल्या, त्यातील कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीवर भरभरून प्रेम दाखवले, त्यांच्या बँक खात्यात आम्ही हे अधिवेशन संपल्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणार आहोत. लाडकी बहीण योजनेसाठी कोणतेही निकष लावलेले नाहीत. फक्त काही लोकांनी चुकीच्या पद्धतीनेयोजनेचा लाभ घेतल्याचे लक्षात येत आहे. काहींनी चार-चार बँक खाती तयार करून फायदा घेतला आहे. समाजात जसे चांगल्या प्रवृत्तीचे लोक असतात तसे काही काही वाईट प्रवृत्तीचे लोकही असतात. मागच्या काळात आमच्या लक्षात आले की पुरुषानेच ९ खाती काढून योजनेचा फायदा घेतला. आता या पुरुषाला लाडका भाऊदेखील म्हणू शकत नाही. कारण बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणारा भाऊ लाडका असू शकत नाही. त्यामुळे अशा लोकांनी फायदा घेऊ नये याची आम्ही काळजी घेऊ. कारण हा जनतेचा पैसा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.