मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तालुक्यात प्रथम पिंपळे आश्रम शाळा!

आबिद शेख/अमळनेर
तालुक्यातील अनुदानित आदिवासी आश्रम शाळा पिंपळे बु. शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा – २ या स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवत श्री चिंतामणी संकुलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला ! सदर स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या खाजगी अस्थापनांच्या शाळा गटातून स्वतःची यशस्वी कामगिरी नोंदवत व उत्कृष्टता सिद्ध करत, तालुक्यातील अव्वल शाळांना मागे टाकत स्वतःचा एक अलौकिक ठसा पिंपळे आश्रम शाळेने नोंदवून जिल्ह्याभरात सर्वांचे लक्ष वेधले आहे.अनुदानित आदिवासी आश्रम शाळा पिंपळे बु. ने आपल्या उत्कृष्ट व नियोजनबद्ध कामगिरीच्या बळावर सर्व शाळांना मागे टाकून यश संपादन केले. “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ” टप्पा – २ ही स्पर्धा राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात आली होती. स्पर्धेच्या माध्यमातून शालेय भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, कौशल्यात्मक विकास, दर्जेदार गुणवत्ता पूर्ण शिक्षण व शिक्षक उपक्रमशीलतेत वृद्धी, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता जोपासना ,नियोजनबद्धता व शिस्त आणि विद्यार्थी व त्या अनुषंगाने शाळेचा सर्वांगीण विकास होणे या हेतूने संपूर्ण महाराष्ट्रात शालेय विभागातर्फे सदर स्पर्धा घेण्यात आलेली होती. स्पर्धेची उद्दिष्ट व निकष अतिशय निकोप होते व त्यात पिंपळे आश्रम शाळेने गुणवत्तेचा अतिउच्च नमुना दाखवत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. प्राथमिक मुख्याध्यापक अविनाश अहिरे व माध्यमिक मुख्याध्यापक उदय पाटील यांच्या नियोजनाने व संस्थेच्या मार्गदर्शनाने प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी निकषांची पूर्तता करत शाळेस हा बहुमान मिळवून दिला. स्पर्धेतील विजयाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ माईसो विद्याताई पाटील, सचिव श्री नानासाहेब युवराज पाटील साहेब यांनी मुख्याध्यापक , शिक्षक ,विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले. संस्थेच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक करत, आश्रम शाळेने हा बहुमान मिळवणे म्हणजेच एक अलौकिक प्रेरणा ठरेल असा मानस व्यक्त केला व पुढील उत्तुंग कामगिरी करिता मुख्याध्यापक , शिक्षक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
