धारावीच्या सिमरनला घरातूनच मिळाले क्रिकेटचे बाळकडू…. -वडिलांकडून मिळाला क्रिकेटप्रेमाचा वारसा

24 प्राईम न्यूज 22 Dec 2024. लहानपणापासून भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घालण्याचे स्वप्न पाहणारी धारावीची २२ वर्षीय सिमरन सध्या नवोदित खेळाडूंमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. रविवारी वुमन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) मध्ये झालेल्या लिलावात अहमदाबादच्या गुजरात जायंट्सने तब्बल १.९० कोटी रुपयांची बोली लावून सिमरनला फलंदाज म्हणून संघात स्थान दिले. तेव्हापासून ती अचानक प्रकाशझोतात आली आहे. विविध कारणांसाठी जगभरात ओळखली जाणारी धारावी आता देशभरातील क्रिकेट पटलावर देखील आपले वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
धारावीतील एका सामान्य कुटुंबातून क्रीडा क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सिमरनचा आजवरचा प्रवास खडतर होता. गल्ली क्रिकेटपासून डब्ल्यूपीएलपर्यंत मजल मारणारी सिमरन अनेक महिला खेळाडूंसाठी आदर्श ठरली आहे.
सिमरनला क्रिकेटप्रेमाचा वारसा तिच्या वडिलांकडूनच मिळाला आहे. उमेदीच्या काळात स्थानिक स्पर्धांमध्ये जावेद शेख यांनी केलेल्या चमकदार खेळीमुळे त्यांना ‘धारावीचा जावेद मियांदाद’ अशी ओळख मिळाली होती. “क्रिकेटचा वारसा सिमरनने माझ्याकडूनच घेतला असावा.
अल्लाहने आमच्या पदरात हिरा दिलाय. तो हिरा साऱ्या जगभरात चमकेल, याची मला खात्री आहे,” अशा शब्दांत वडील जावेद शेख यांनी सिमरनच्या भविष्याबाबत विश्वास व्यक्त केला.
अनेक आर्थिक आणि सामाजिक आव्हानांना तोंड देत सिमरनच्या आई-वडिलांनी तिच्या क्रिकेटप्रेमाला नेहमीच प्रोत्साहन दिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही विचलित न होता यशाच्या दिशेने वाटचाल करण्याची सिमरनची ही कथा म्हणजे धारावीकरांच्या ऊर्जेचे प्रतीक आहे.