लाडक्या बहिणींना नाताळची भेट. – डिसेंबरचा दीड हजारांचा हप्ता मिळण्यास सुरुवात-अदिती तटकरे.

24 प्राईम न्यूज 25 Dec 2024. विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी वरदान ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महायुती सरकारने नाताळची भेट दिली आहे. डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात मंगळवारपासून डीबीटीद्वारे (डायरेक्ट बेनिफीट ट्रान्स्फर) हप्ता जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स या समाजमाध्यमाद्वारे दिली आहे. सोबतच पुढच्या ३ ते ४ दिवसांत टप्याटप्प्याने लाभ वितरित होईल. डिसेंबरअखेरपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात या महिन्याचे पैसे जमा होतील, अशी माहितीदेखील अदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
महायुती सरकारने जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा प्रत्येकी दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. त्यानुसार लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जुलै, ऑगस्ट महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये, यानंतर सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये, तर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित ३ हजार रुपये असे ३ टप्प्यांमध्ये एकूण ७ हजार ५०० रुपये जमा करण्यात आले होते. यानंतर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या योजनेला ब्रेक लागला होता.