रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने “जॉय ऑफ लर्निंग” कार्यशाळेचा यशस्वी आयोजन..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने दिनांक २०, २१ आणि २२ डिसेंबर २०२४ रोजी रॉयल उर्दू प्रायमरी स्कूल, रॉयल उर्दू हायस्कूल, व रॉयल उर्दू ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे तीन दिवसीय “जॉय ऑफ लर्निंग” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्याची गोडी आणि विज्ञानाचा आनंद देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुण्यातील शिक्षणतज्ज्ञ, लेखक, व मोटिव्हेशनल स्पीकर प्रा. मुज्तबा लोखंडवाला यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिकण्याचे तंत्र, मानसिक ताण कमी करण्याचे उपाय, व शिक्षणास अधिक आनंददायी बनवण्याच्या पद्धती सांगितल्या.
कार्यशाळेत पारंपरिक शिक्षण पद्धतीला नवा दृष्टिकोन देत, प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञान शिकवले गेले. विद्यार्थ्यांना पाण्याची घनता आणि जहाज का तरंगते, रॉकेट विज्ञानासारख्या संकल्पनांवर आधारित प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. या कार्यशाळेमुळे मुलांमध्ये विज्ञानाविषयीची आवड निर्माण झाली आणि शिक्षणाचा गोडवा अनुभवता आला.
पालकांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. यात मुलांच्या शिक्षणात हसत-खेळत शिकण्याची भूमिका आणि तणावमुक्त वातावरणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी रोटरी क्लब अमळनेरचे अध्यक्ष ताहा बुकवाला, सौ. नसरीन बुकवाला, प्रा. डॉ. दिलीप भावसार, मकसुद बोहरी, सौ. मेहराज बोहरी, संस्थेचे अध्यक्ष अखलाक शेख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या अलमास मॅडम, नाजीम सर, नविद सर व संपूर्ण शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाविषयीचे सकारात्मक दृष्टिकोन वाढत आहेत.