अमळनेर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न: निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेवर भर

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक आज छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे सकाळी 11 वाजता संपन्न झाली. राष्ट्रीय मतदार दिवस निमित्ताने आयोजित या बैठकीत निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व निपक्षपातीपणा यावर भर देण्यात आला.
बैठकीचे प्रास्ताविक तालुका काँग्रेस अध्यक्ष बी.के. सूर्यवंशी यांनी केले. त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीतील विसंगतींचा उल्लेख करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाचा पराभव झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना आश्चर्यकारक बहुमत कसे मिळाले? मतदारसंख्येत झालेली अनपेक्षित वाढ आणि मतमोजणीच्या आकडेवारीतील तफावत हे गंभीर मुद्दे आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
प्रा. श्याम पवार यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या जाचक भाडेवाढीवर नाराजी व्यक्त केली व ती त्वरित रद्द करावी, असा ठराव मांडला. यानंतर देश व राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. शांततेच्या मार्गाने संविधानिक बदल घडवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या “जय बापू, जय भीम, जय संविधान” या घोषणांनी वातावरण भारावून गेले. ऍड रझाक शेख यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर तहसील कार्यालयात जाऊन मा. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी केले तर गजानन साळुंखे यांनी आभार मानले. या बैठकीस काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.