सेवा समाप्त होमगार्ड पुन्हा कार्यरत; ६५ जणांना दिलासा

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर: जळगाव जिल्ह्यातून कायमस्वरूपी सेवेतून काढण्यात आलेल्या ६५ होमगार्ड कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिले आहेत. यामध्ये अमळनेर तालुक्यातील ११ होमगार्डचा समावेश आहे.
खासदार स्मिता वाघ आणि आमदार अनिल पाटील यांनी या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र दिले होते. निवडणूक बंदोबस्ताचे कर्तव्य न केल्याच्या कारणावरून या होमगार्डना होमगार्ड अधिनियम १९४० च्या कलम ६(ब), २ अन्वये सेवेतून कमी करण्यात आले होते.
सेवा समाप्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी अपील दाखल केले होते तसेच खासदार आणि आमदारांकडे तक्रार केली होती. कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर, अप्पर पोलीस अधीक्षक नखाते यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे जळगाव, चाळीसगाव, भडगाव, जामनेर, रावेर, धरणगाव, सावदा, पाचोरा, भुसावळ, यावल, वरणगाव या भागातील होमगार्ड कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.