सानेगुरुजी पतपेढीचा सभासदहिताचा निर्णय – कर्ज मर्यादा वाढली, व्याजदर कमी

आबिद शेख अमळनेर. -पू. सानेगुरुजी शिक्षक व इतर नोकर वर्गाची पतपेढीच्या संचालक मंडळाने अध्यक्ष सुशील भदाणे यांच्या नेतृत्वाखाली सभासदांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला आहे. कर्ज मर्यादेत वाढ करून व्याजदर कमी करण्यात आले असून, कर्ज फेडीचा कालावधीही वाढवण्यात आला आहे.
यापूर्वी जामीन कर्जाची मर्यादा ६ लाख रुपये होती, परंतु आता ती वाढवून ७ लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच कर्ज फेडीचा कालावधी ७२ महिन्यांवरून ८४ महिने करण्यात आला आहे, तर व्याजदर ८ टक्क्यांवरून कमी करून ७.५ टक्के करण्यात आला आहे.
आकस्मित कर्ज योजनेतही सुधारणा करण्यात आली आहे. याआधी विशेष कर्ज मर्यादा ५ लाख रुपये होती, आता ती ६ लाख रुपये करण्यात आली आहे. कर्ज फेड ६० महिन्यांवरून ७२ महिने करण्यात आली असून, व्याजदर ९.५ टक्क्यांवरून ९ टक्के करण्यात आला आहे.
पतपेढीच्या संचालक मंडळाने घेतलेला हा निर्णय सभासदांना दिलासा देणारा असून, अधिक कर्ज मिळण्यासह फेडीचा ताणही कमी होणार आहे. इतर संस्थांच्या तुलनेत कमी व्याजदर असल्याने हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.