अमळनेरमध्ये भव्य समग्र आरोग्य तपासणी शिबिर – ३५०० रुपयांच्या चाचण्या मोफत..


अमळनेर /आबिद शेख
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व दि. अमळनेर को-ऑप. अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त भव्य मोफत समग्र आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज शुक्रवार, ४ जुलै रोजी करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ११ वाजता पू. सानेगुरुजी पुतळा समोर, स्टेशन रोड, अमळनेर येथील बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर होणार आहे.
या शिबिराचे आयोजन दि. अमळनेर अर्बन बँक, जिल्हा उपनिबंधक अमळनेर, सहाय्यक निबंधक कार्यालय (सहकार खाते) आणि लायन्स क्लब, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
विशेष बाब म्हणजे सदर शिबिरात सुमारे ३५०० रुपयांचा खर्च येणाऱ्या विविध आरोग्य चाचण्या संपूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. चाचणीस येणाऱ्या नागरिकांनी शिबिरास येण्यापूर्वी किमान ३ ते ४ तास उपाशी राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या आरोग्य तपासणीचा लाभ अमळनेर अर्बन बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक, कर्मचारी, पिग्मी एजंट तसेच बँकेचे हितचिंतक व लायन्स क्लबचे सदस्य यांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन चेअरमन पंकज मुंदडे, व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, व्यवस्थापक अमृत पाटील तसेच सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
लायन्स क्लब, अमळनेरचे प्रेसिडेंट डॉ. संदीप जोशी, सेक्रेटरी महेंद्र पाटील आणि ट्रेझरर नितीन विंचूरकर यांचाही शिबिर आयोजनात मोलाचा सहभाग असून, आरोग्य चाचण्यांद्वारे नागरिकांनी आपले आरोग्य तपासून घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.