नवसाला पावणाऱ्या गणपती मंदिराचे रंगरंगोटीने सौंदर्यीकरण

आबिद शेख/ अमळनेर. कळमसरे (ता. अमळनेर) येथील नीम कपिलेश्वर रस्त्यावरील नवसाला पावणाऱ्या गणपती मंदिराला येथील सोसायटीचे माजी चेअरमन मधुकर यशवंत माळी यांनी स्वखर्चाने रंगकाम करून दिले.
गेल्या २५ वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून या मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. मंदिराच्या सौंदर्यवृद्धीसाठी ट्रस्ट्री अध्यक्ष हरीश मराठे यांनी रंगकामासाठी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मधुकर माळी यांनी ५०,००० रुपयांचा खर्च करून मंदिराला रंगरंगोटी करून दिली.
या कार्याबद्दल गणपती मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष हरीश परशुराम मराठे यांच्या हस्ते मधुकर माळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटी चेअरमन सुनील राजपूत, देविदास माळी आदी मान्यवर उपस्थित होते.