माजी मंत्री व आमदार अनिल पाटील यांनी नाकारली वाय प्लस सुरक्षा..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर: महाराष्ट्राचे माजी मदत व पुनर्वसन (आपत्ती व्यवस्थापन) मंत्री आणि विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांनी स्वतःहून राज्य सरकारकडून पुरविण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा नाकारली आहे. यासंदर्भात त्यांनी 11 फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना लेखी पत्र देत सुरक्षा काढण्याची विनंती केली.
माजी मंत्रीपदाच्या कार्यकाळात शासनाने त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली होती, ज्यामध्ये एक पोलीस व्हॅन आणि पोलीस अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश होता. मात्र, मागील विधानसभा बरखास्तीनंतर झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले असले तरी, त्यांना नव्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही.
अशा परिस्थितीतही त्यांची सुरक्षा कायम होती. मात्र, आता याची गरज नसल्याचे सांगत त्यांनी सुरक्षा काढून टाकण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून अधिकृतरित्या विनंती केली आहे.