शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षिकेला जातीवाचक शिवीगाळ; सात जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तांबापूर येथील शिवाजी हायस्कूल जुनिअर कॉलेजमध्ये एका महिला शिक्षिकेला अन्य सहकारी शिक्षकांनी जातीवाचक शिवीगाळ करत हीन वागणूक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित शिक्षिकेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, 28 जानेवारी रोजी कर्तव्यावर असताना महिला कक्षात गेल्यावर बसण्यासाठी खुर्ची घेतली. त्यावेळी शिक्षिका ललिता वंजी पाटील, शितल दिलीप देसले, संगीता प्रकाश पाटील आणि अलका शिवाजी देवरे यांनी जातीवाचक टीका करत अपमानास्पद वर्तन केले. रडत बाहेर पडल्यावर सुधाकर मुरलीधर पाटील, संजय प्रल्हाद पाटील आणि संदीप अशोकपुरी गोसावी यांनी देखील अपमानकारक वर्तन केले. तसेच शिपायाला पाणी मागितले असता, त्यांनाही पाणी देऊ दिले गेले नाही.
यानंतर मुख्याध्यापक कक्षात जाऊन पुन्हा शिवीगाळ करण्यात आली. मुख्याध्यापकांनी बाजू घेतल्यास त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली. घरी जाऊन पतीला प्रकार सांगितल्यानंतर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी सुधाकर मुरलीधर पाटील, संजय प्रल्हाद पाटील, संदीप अशोकपुरी गोसावी, ललिता वंजी पाटील, शितल दिलीप देसले, संगीता प्रकाश पाटील आणि अलका शिवाजी देवरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप करीत आहेत.