अमळनेरमध्ये बंजारा संस्कृतीचा जल्लोष, संत सेवालाल महाराजांच्या जयघोषाने दुमदुमले शहर…

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर येथे संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. तालुक्यातील नऊ तांड्यातील बंजारा समाज बांधव पारंपारिक वेशभूषेत, हजारोंच्या संख्येने विश्रामगृह येथे एकवटले होते.
मिरवणुकीस संत सेवालाल महाराजांच्या रथाच्या पूजनाने सुरुवात झाली. हातात पांढरा ध्वज घेऊन घोड्यावर स्वार झालेल्या बंजारन रोशनी पवार यांनी विशेष लक्ष वेधले. डीजेच्या ठेक्यावर बंजारा पारंपारिक वेशभूषेत समाज बांधवांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले.
यानंतर दोडे गुजर भवन येथे संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्राध्यापिका वैशालीताई राठोड आणि अमळनेरचे एपीआय देसले साहेब यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बंजारा क्रांती दल नंदुरबारचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्रावण चव्हाण होते. तसेच, मा. एकनाथ जाधव यांनी आपल्या मधुर आवाजात बंजारा सक्षेला गाऊन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. भिका भाऊ यांच्या हस्ते प्रतिमेला भोग अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाच्या पुढील सत्रात संत सेवालाल महाराज यांच्या जीवनकार्यावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरेच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींनी बंजारा साहित्य आणि संस्कृतीचे दर्शन नृत्यातून घडविले.
या भव्य सोहळ्यासाठी संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष किरण जाधव, प्रकाश पवार सर, भिका भाऊ, एकनाथ जाधव, राम पवार साहेब, अनिल जाधव सर, किशोर पवार, राहुल राठोड, रमेश पवार, राहुल चव्हाण, संजय राठोड, राजेश राठोड सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेश राठोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन किरण जाधव यांनी मानले.