आंतरजिल्हा युवा आदान प्रदान कार्यक्रमाचा समारोप; खासदार स्मिताताई वाघ यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन..

आबिद शेख/ अमळनेर
नेहरू युवा केंद्र, जळगावतर्फे “मेरा युवा भारत” उपक्रमांतर्गत १३ ते १७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान आंतरजिल्हा युवा आदान प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुंबईतील २७ युवा प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी (१५ फेब्रुवारी), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे लालमती आश्रम शाळा आणि गाव येथे भेट देण्यात आली. या दौऱ्यात स्थानिक जीवनशैली आणि विकास योजनांची माहिती घेण्यात आली. त्यानंतर मनोलव प्रकल्प आणि दीपस्तंभ संस्थेतील अपंग विद्यार्थी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी युजवेंद्र महाजन यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला.
१६ फेब्रुवारी रोजी अजिंठा लेण्यांना भेट देत, भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची माहिती देण्यात आली.
समारोप सोहळा १७ फेब्रुवारी रोजी खासदार स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी, जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र यांनी पाच दिवसांच्या उपक्रमाचा आढावा सादर केला. यानंतर, एमएसआरटीसीचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी जळगावच्या वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा आणि भविष्यातील विकासकामांबाबत तरुणांना मार्गदर्शन केले.
तसेच, प्राचार्य सोना कुमार यांनी नवीन शैक्षणिक प्रणाली आणि करिअरच्या संधींबाबत माहिती दिली.
खासदार स्मिताताई वाघ यांनी युवा वर्गाला देश आणि समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. त्यांनी जळगावच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाबाबत, एमआयडीसी विस्तार, विमानतळ उन्नतीकरण तसेच दुर्गम आदिवासी गावांच्या विद्युतीकरणासाठी केंद्र सरकारने दिलेल्या निधीची माहिती दिली.
यासोबतच, भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया आणि कौशल्य विकास योजनांचे महत्त्व पटवून देत, तरुणांनी व्यावसायिकतेवर भर द्यावा आणि कौशल्य वाढवून आत्मनिर्भर बनावे, असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी युवा प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. तसेच, सहभागी तरुणांनी या पाच दिवसांच्या प्रवासातील अनुभव शेअर केले. अजिंक्य गवळी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात तुषार साळवे, तेजस पाटील, अनिल बाविस्कर, मुकेश भालेराव आणि रोहन अवचरे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.