शाळा बंद नाहीत, पण शिक्षकही नाहीत! दुर्गम भागांतील शिक्षणावर संक्रांत..

24 प्राईम न्यूज 24 Feb 2025
राज्यात कमी पटसंख्येच्या शाळांवर टांगती तलवार कायम आहे. सरकारकडून वारंवार शाळा बंद न करण्याचे आश्वासन दिले जात असले, तरी प्रत्यक्षात शिक्षक पदे मंजूर न करण्याचा आडमार्ग अवलंबला जात आहे.
राज्यातील शाळांची संचमान्यता प्रक्रिया सुरू असून, सहावी ते आठवीसाठी वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांसाठी शिक्षकांची एकही पदे मंजूर करण्यात आलेली नाहीत. यामुळे अशा शाळा तशाच सुरू राहतील, पण त्यात शिक्षकच नसतील, अशी विचित्र स्थिती निर्माण होणार आहे. दुर्गम भागांतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सरकारने उच्च न्यायालयात शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी शिक्षण विभागाने कमी पटसंख्येच्या शाळांतील शिक्षकांचे समायोजन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याशिवाय, या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णयही मागे घेण्यात आला आहे. परिणामी, कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये ना नियमित शिक्षक असतील, ना कंत्राटी! त्यामुळे सरकार शाळा थेट बंद करण्याऐवजी विद्यार्थी आपणहून दुरावतील, असा अप्रत्यक्ष मार्ग अवलंबत असल्याचा आरोप शिक्षणतज्ज्ञांकडून केला जात आहे.