विराटच्या शतकाने भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, उपांत्य फेरीत प्रवेश..

24 प्राईम न्यूज 24 Feb 2025
क्रिकेट विश्वातील कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना रविवारी पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव करत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत धडक मारली.
पाकिस्तानने भारतासमोर २४२ धावांचे आव्हान ठेवले होते, जे भारतीय संघाने ४२.३ षटकांतच ४ विकेट्स गमावून पूर्ण केले. या विजयाचा शिल्पकार ठरला विराट कोहली, ज्याने नाबाद १०२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे, भारताला विजयासाठी २ धावांची गरज असताना विराटने चौकार ठोकत आपले ५१ वे एकदिवसीय शतक पूर्ण केले.
याशिवाय, कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय ठरला, तर पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव झाला. या पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.