रस्त्यांमध्येच अडथळे! विद्युत खांब, तारा आणि अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा..

आबिद शेख/अमळनेर
शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर विद्युत खांब आणि तारा रस्त्याच्या मध्यभागी येऊन अडथळा निर्माण करत आहेत. या समस्येमुळे अपघातांना आमंत्रण मिळत असून प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे.
पिंपळे रस्त्यावर अनियोजित विकास
पिंपळे रस्त्यावर एका नाल्यावर पूल आणि जोड रस्ता असा विचित्र पद्धतीने बांधण्यात आला आहे की आधीचा आणि नंतरचा रस्ता २-३ फूट सरकले आहेत. रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू असताना भर रस्त्यातील विजेचा खांब तसेच ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, येथे कोणतेही घर नसतानाही रस्ता का बांधला, हा प्रश्न अमळनेरवासीयांना पडला आहे. जाणकारांच्या मते, काहींना प्लॉटिंगचा फायदा मिळावा म्हणून हा विकास केला जात असल्याचे दिसते.
बोरसे कॉलनी आणि बसस्थानक परिसरातही समस्यांचा डोंगर
धुळे रोडलगत बोरसे कॉलनीत रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले असले तरी रस्त्यातील तारा काढण्याची कोणतीही तसदी घेतलेली नाही. या ठिकाणी वळणावर असलेल्या तारांमुळे लहान मुले, सायकलस्वार आणि मोटरसायकलस्वार यांना अडथळा निर्माण होऊन किरकोळ अपघात होत आहेत.
तसेच, बसस्थानकासमोर भागवत रस्ता डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण करण्यात आले, मात्र पालिकेने स्वतःच लोखंडी बार लावून तो रस्ता बंद करून टाकला. परिणामी, हा रस्ता नेमका कोणासाठी आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. काही दुकानांचे अतिक्रमण हटवण्याऐवजी त्यांच्यासाठी सोय केली जात असल्याचा आरोपही होत आहे.
यासंदर्भात पालिका, लोकशाही दिन आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. नागरिकांनी आता प्रशासनाकडे रस्त्यातील अडथळे दूर करण्याची मागणी लावून धरली आहे.