राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट – महागाई भत्त्यात ३% वाढ

24 प्राईम न्यूज 26 Feb 2025
राज्य सरकारने आपल्या १४ लाखांहून अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवला आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के झाला आहे. हा वाढीव भत्ता १ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आला असून, जुलै २०२४ ते जानेवारी २०२५ या सात महिन्यांचा फरक फेब्रुवारीच्या वेतनात मिळणार आहे.
या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर दरमहा १५० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. केंद्र सरकारनेही १ जुलै २०२४ पासून आपल्या कर्मचाऱ्यांना ३ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला होता. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही हा लाभ देण्याचे धोरण असले तरी, विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकानुकूल योजना राबवल्यामुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता.
राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी वाढीव महागाई भत्त्यासाठी आंदोलने करण्याचा इशारा दिला होता. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय जाहीर करत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.