शिर्डीहून इंदूरला जाणारी बस अपघातग्रस्त; महिला ठार, २२ प्रवासी जखमी.

धुळे/प्रतिनिधी. -शिर्डीहून इंदूरला जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बस मंगळवारी (दि. २५) पहाटे ३ वाजता दाभाशी फाट्यानजीक उलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून २२ प्रवासी जखमी झाले आहेत. गंभीर जखमींपैकी आठ जणांना अधिक उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मध्यप्रदेशच्या हंस ट्रॅव्हल्सची ही बस (एमपी ०९ पीए ०२७१) शिर्डीहून निघाली होती. रात्री २ वाजता सोनगीरजवळ चालक आणि क्लीनर जेवणासाठी थांबले होते. त्यानंतर बसने पुढील प्रवास सुरू केला. मात्र, पहाटे ३ वाजता धुळे-शिरपूर मार्गावरील दाभाशी गावाजवळ बस अचानक उलटली. अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात २२ प्रवासी जखमी झाले असून त्यातील आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी धुळ्यात हलवण्यात आले आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.