कर्तव्यनिष्ठ अधिकारीचा गौरवशाली निरोप – “न्यायासाठी झुंजणारा योद्धा”

आबिद शेख/अमळनेर
न्यायाची भूमिका घेत मृदू स्वभाव राखणारा, परंतु गरज पडल्यास गुन्हेगारांचा एन्काऊंटर करण्यास मागे-पुढे न पाहणारा कर्तव्यदक्ष आणि समाजाभिमुख पोलीस निरीक्षक विकास सुखदेव देवरे २८ फेब्रुवारी रोजी ३८ वर्षे १० महिने १७ दिवसांची प्रदीर्घ सेवा करून निवृत्त होत आहेत.
मालेगाव तालुक्यातील उमराणे गावचे मूळ रहिवासी असलेल्या विकास देवरे यांचे आई-वडील शेतकरी होते. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण उमराणेतच पूर्ण करून त्यांनी कुटुंबाच्या शेतीकामात मदत करत मालेगाव येथे बी.ए. पर्यंत शिक्षण घेतले. १९८९ साली एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन ते पोलीस दलात दाखल झाले.
त्यांनी घोटी, नाशिक, नागपूर, अहमदनगर, अकोला, जळगाव, अमळनेर अशा विविध ठिकाणी सेवा बजावत समाजरक्षणासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यशैलीत संयम आणि समजुतीने वाद मिटवण्याचा प्रयत्न असायचा, मात्र अन्याय करणाऱ्यांना ते कधीही माफ करत नसत.
कर्तव्यनिष्ठ, सुस्वभावी आणि न्यायप्रिय अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या विकास देवरे यांच्या निवृत्तीने पोलीस दलातील एक जबाबदार, सक्षम आणि निर्भय अधिकारी सेवा सोडत आहे. त्यांचे कार्य कायम प्रेरणादायी राहील.