धक्कादायक! खानदेशी रील स्टारचा संशयास्पद मृत्यू, वडिलांची आत्महत्या – तालुका हादरला.

0

24 प्राईम न्यूज 28 Feb 2025

धरणगाव तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध खानदेशी रील स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील (वय २२, रा. भोरखेडा, ता. धरणगाव, ह.मु. एरंडोल) याचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती.

एकाच कुटुंबातील दोन मृत्यूंमुळे तालुक्यात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, विकी पाटील हा एरंडोल शहरात राहत होता, तर त्याचे आई-वडील एरंडोल येथेच वास्तव्यास होते. विकीचे वडील विठ्ठल सखाराम पाटील हे माजी सैनिक होते. मंगळवारी, २५ फेब्रुवारी रोजी विठ्ठल पाटील यांनी आत्महत्या केली होती आणि सुसाईड नोट लिहून मृत्यूला सामोरे गेले होते. त्याच दरम्यान, विकी पाटील बेपत्ता असल्याचे समोर आले होते.

गुरुवारी, २७ फेब्रुवारी रोजी दुपारी भोरखेडा गावाजवळील एका नाल्यात विकी पाटील याचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धरणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक धवनकुमार देसले, अपर पोलीस अधीक्षिका कविता नेरकर आणि पोलीस अधीक्षक महेश्वर रेही यांनी पथकासह भेट दिली. जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.

आत्महत्या की हत्या? पोलिसांचा तपास सुरू

वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत मुलाचाही मृतदेह आढळल्याने हा योगायोग आहे की त्यामागे कोणते गूढ दडले आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. विकी पाटीलच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आत्महत्या की हत्या, याचा उलगडा करण्यासाठी तपास सुरू आहे.

या दुहेरी मृत्यूमुळे धरणगाव तालुका हादरला असून, परिसरात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. पोलीस अधिक तपास करत असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!