वकील संरक्षणासाठी मागणी – अमळनेर येथील वकिलावर हल्ल्याचा तीव्र निषेध

आबिद शेख/अमळनेर
– अमळनेर वकील संघाचे सभासद अॅड. प्रशांत आर. बडगुजर यांच्यावर दिनांक ४ मार्च २०२५ रोजी दुपारी ४ वाजता न्यायालयासमोर भ्याड हल्ला करण्यात आला. आरोपी राजेंद्र पवार आणि त्यांची बहिण मिनाक्षी भामरे यांनी हा हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक ८७/२०२५ नोंदविण्यात आला आहे.
अमळनेर वकील संघाने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, या प्रकरणातील दोषींवर तात्काळ अटक करून कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून भारतीय वकील संरक्षण अधिनियम तात्काळ लागू करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या संदर्भात प्रधानमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी जळगाव आणि जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. वकिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली जावीत, अशी सर्व वकिलांची मागणी आहे.