आदिवासी ठाकूर समाजाच्या होळीला महिलांची ऐतिहासिक सुरुवात..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर येथे आदिवासी ठाकूर समाजाच्या शिमगा उत्सवाला यंदा महिलांनी होळी पेटवून उत्सवाला ऐतिहासिक सुरुवात केली. टाऊन हॉल मैदानात परंपरेनुसार होळी उभारण्यात आली. मात्र, यंदा महिलांनीच होळी पेटवण्याची नवीन प्रथा सुरू केली.
ठाकूर समाज महिला मंडळाच्या नेतृत्वाखाली महिलांनी होळीची सजावट करून पारंपरिक विधी पार पाडले. त्यांनी नारळाची ओटी वाहून, हार अर्पण करून, अग्नी प्रज्वलित केला. उपस्थितांनी “एकच चाले, आदिवासी चाले” अशा पारंपरिक गाण्यांवर फेर धरून उत्सव साजरा केला.
यावेळी ठाकूर समाजाच्या मान्यवरांसह, हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आदिवासी ठाकूर समाजाचा पाच दिवसीय शिमगा उत्सव धुलीवंदन ते रंगपंचमीपर्यंत जल्लोषात साजरा केला जातो.