अमळनेरमध्ये न्यायासाठी दिव्यांगाचा लढा – आरोपींच्या अटकेसाठी परिवारासह उपोषणाचा इशारा…

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – आपल्या वडिलांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची अद्याप अटक न झाल्याने फरीद ख्वाजा हसन तेली (दिव्यांग) यांनी न्यायासाठी परिवारासह उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
अर्जदार फरीद तेली यांनी दिलेल्या निवेदनानुसार, 12 ऑगस्ट 2024 रोजी प्रॉपर्टीच्या वादातून कांती रमजान तेली, त्यांचे भाऊ, मुले आणि अन्य आरोपींनी त्यांचे वडील ख्वाजा हसन तेली यांना पेट्रोल ओतून जिवंत जाळले. गंभीर भाजल्याने चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 16 ऑगस्ट 2024 रोजी धुळे येथे त्यांचे निधन झाले. मृत्यूपूर्व जबाबात त्यांनी एकूण नऊ आरोपींचा उल्लेख केला होता, त्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 389/2024 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तथापि, सात महिने उलटूनही काही प्रमुख आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्यांना अटक करत नसल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे. विशेष म्हणजे, सेशन कोर्ट आणि उच्च न्यायालयाने कांती रमजान तेली व त्यांच्या साथीदारांचा जामीन अर्ज नामंजूर केला असला, तरी आरोपी खुलेआम समाजात फिरत असल्याचा आरोप आहे.
फरीद तेली यांनी निवेदनात नमूद केले आहे की, आरोपी त्यांना धमक्या देत आहेत आणि “आम्ही लाखो रुपये दिले आहेत, त्यामुळे पोलीस आम्हाला अटक करणार नाहीत” असे खुलेआम सांगत आहेत. त्यामुळे आपण 21 मार्च 2025 पासून अमळनेरच्या प्रांत अधिकारी कार्यालयाबाहेर परिवारासह उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांनी पुढे असा इशाराही दिला की, जर त्यांच्या कुटुंबाला कोणतीही हानी पोहोचली, तर त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील. या गंभीर आरोपांमुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.