अमळनेर दहशतीसाठी कुप्रसिद्ध ‘कात्या’ सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – शिवाजीनगर, शिरुडनाका परिसरात गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत निर्माण करणारा कात्या उर्फ प्रमोद गौरव महाले याला सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. हा आदेश उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी सुनावणीअंती दिला.
कात्या याच्यावर चोरी, दरोडा, जीवे मारण्याची धमकी, जबरी लूट अशा स्वरूपाचे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयीन खटल्यात अनुपस्थित राहून त्याने जामीनाच्या अटीही भंग केल्या होत्या. त्यामुळे त्याच्या विरोधातील पोलीस प्रस्ताव गांभीर्याने घेण्यात आला.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी हद्दपारीचा प्रस्ताव डीवायएसपी विनायक कोते यांच्याकडे सादर केला होता. कोते यांनी चौकशी करून तो उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला. सुनावणीत दोन्ही बाजू ऐकून महाले याला जिल्हा हद्दपारीचा आदेश देण्यात आला.
ही कारवाई शहरात शिस्त व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.