अमळनेर अवैध वाळू वाहतुकीवर प्रशासनाची धडक कारवाई; एसडीओंच्या आदेशाने पथकांची नियुक्ती, ट्रॅक्टर व टेम्पो जप्त..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर— तालुक्यातील नदीकाठावरून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीला आळा बसवण्यासाठी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी कडक पावले उचलली आहेत. मंडळाधिकारी, तलाठी, पोलीस पाटील आणि कोतवाल यांच्या संयुक्त पथकांची नियुक्ती करून रात्रीच्या वेळी गस्त सुरू करण्यात आली असून, पहाटे दोन ट्रॅक्टर आणि दोन टेम्पोवर कारवाई करण्यात आली आहे.
अवैध वाहतुकीची माहिती मिळताच कठोर पावले
बोरी, पांझरा आणि तापी नदीच्या काठावरून वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याच्या सतत तक्रारी येत होत्या. याआधी तलाठी पथके पाठवूनही अपेक्षित यश न मिळाल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्वतः बैठक घेऊन मंडळाधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल आणि तलाठी यांची पथके तयार केली. महिलांवरील सुरक्षिततेचा विचार करून महिला कर्मचाऱ्यांना दिवसा गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पथकांची रचना आणि चेकपोस्टची आखणी
प्रत्येक वाळू चेकपोस्टवर २० ते २५ जणांची मजबूत पथकं तैनात करण्यात आली आहेत:१ मंडळाधिकारी ६ ते १२ पोलीस पाटील ३ ते ४ तलाठी ४ ते ६ कोतवाल ही पथकं आळीपाळीने गस्त घालणार असून, दररोज पथकांमध्ये बदल केला जाणार आहे.
महत्वाचे चेकपोस्ट स्थान: मांडळ चेक पोस्ट – मांडळ ते बाम्हणे फाटा ते धुळे हद्द बोहरा चेक पोस्ट – बाम्हणे फाटा ते बोहरा जळोद चेक पोस्ट – जळोद ते बोहरा सावखेडा चेक पोस्ट – सावखेडा ते धरणगाव हद्द बिलखेडा-फापोरे चेक पोस्ट – बोरी नदी, पारोळा हद्द कारवाईची ठळक उदाहरणे
दि. २ जुलै रोजी, बिलखेडा शिवारात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मंडळाधिकारी पी.एस. पाटील, तलाठी एम.आर. पाटील, जितेंद्र पाटील, आणि विकेश भोई यांनी दोन ट्रॅक्टर आणि एक टेम्पो पकडून ते तहसील कार्यालयात जमा केले.
विशेष म्हणजे, हिंगोणे खुर्द येथे पकडलेल्या टेम्पोमधील एका वाहनात तहसीलदार सुराणा स्वतः ड्रायव्हरच्या शेजारी बसून टेम्पो तहसील कार्यालयात घेऊन आले, ही गोष्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
प्रशासन ठाम – कोणतेही सेटिंग शक्य नाही
“प्रत्येक दिवशी पथक बदलले जाणार आहे, त्यामुळे कोणताही सेटिंग-संपर्क शक्य नाही. पोलीस पाटील आणि कोतवाल यांची उपस्थिती कायम ठेवून वाळू उपसा रोखण्यात येईल.”
— नितीनकुमार मुंडावरे, उपविभागीय अधिकारी, अमळनेर“प्रशासनाने आम्हा पोलीस पाटलांना विशिष्ट क्षेत्रे नेमून दिली असून, आम्ही रात्री गटात फिरून गस्त घालतो. त्यामुळे अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात आटोक्यात आला आहे.”
— गणेश भामरे, पोलीस पाटील, बाम्हणे