“औरंगजेबासारखेच क्रूर शासक फडणवीस” – काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका

24 प्राईम न्यूज 17 मार्च 2025
“औरंगजेब हा क्रूर शासक होता, त्याने आपल्या वडिलांना तुरुंगात डांबले. तो नेहमीच धर्माचा आधार घ्यायचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही औरंगजेबाइतकेच क्रूर शासक आहेत, कारण तेही नेहमीच धर्माचा आधार घेतात,” अशी बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाच्या मनसुब्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी उधळून लावले. मराठ्यांनी औरंगजेबाला मातीत गाडले, त्याची कबर इतिहासाची साक्षीदार आहे. मात्र, महायुती सरकारला ती कबर नष्ट करायची आहे. म्हणजेच, मराठी माणसाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा पुरावा पुसून टाकायचा आहे,” असा आरोपही सपकाळ यांनी केला.
त्याचबरोबर, “राज्यात संतोष देशमुख यांच्यासारख्या क्रूर हत्या घडत आहेत. खासदारांच्या लेकी-बाळीही सुरक्षित नाहीत. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
त्यांच्या या विधानांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.