व्यवसायिक वादातून केळी विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरातील फळ गल्ली, कुंठे रोड येथे व्यवसायिक वादातून एका केळी विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, शाहिद रहीम बागवान (वय १८, रा. बाहेपुरा, अमळनेर) हा केळी विक्रीचा व्यवसाय करतो. त्याचा व्यवसाय चांगला चालत असल्याने आरोपी वारंवार त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. १५ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता, किरकोळ कारणावरून रईस राजू बागवान (रा. शाहआलनगर) व त्याच्या साथीदारांनी शाहिदवर लाथाबुक्यांनी हल्ला केला. यावेळी शाहरूख हनीफ बागवान याने लोखंडी टरबूज कापण्याच्या चाकूने त्याच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाहिदने डावा हात आडविल्याने त्याचा हात जखमी झाला आणि चाकूचा वार कपाळावर लागला.
जखमी शाहिदला तातडीने नर्मदा फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या तक्रारीनुसार, अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी रईस बागवान, राजू बागवान, अनिस हनीफ बागवान आणि शाहरूख हनीफ बागवान यांच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम १०९, ११५, ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करत आहेत.