विहिरीत पडलेले हरिण सुखरूप बाहेर; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पाणवठ्याच्या मागणीचा आग्रह..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर ताुक्यातील चिमणपुरी पिंपळे शिवारात पुरुषोत्तम लोटन चौधरी यांच्या शेतातील ७५ फूट खोल विहिरीत पाण्याच्या शोधात गेलेले नर जातीचे हरिण पडल्याची घटना घडली. सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी तातडीने ही माहिती पत्रकार डॉ. विलास पाटील यांना दिली. त्यांनी वनविभागाचे वनपाल पी. जे. सोनवणे यांना कळवताच वनविभागाने त्वरित कारवाई केली.
वनपाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली वनमजूर रामदास वेलसे, समाधान पाटील, प्रवीण पाटील, मयूर पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने संध्याकाळी ५:३० वाजता हरिणाला बाहेर काढण्यात आले. प्रथमोपचार केल्यानंतर ते नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
मार्चच्या मध्यातच उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने वन्यप्राण्यांसाठी शिवारात पाणवठ्यांची सोय करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.