दहावी-बारावी उत्तरपत्रिका तपासणीच्या मानधनात वाढ

24 प्राईम न्यूज 26 मार्च 2025
दहावी आणि बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी मिळणाऱ्या कमी मोबदल्याबाबत परीक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे मानधन वाढीची मागणी करण्यात आली होती.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मंडळाने परीक्षक, वरिष्ठ परीक्षक, नियामक आणि मुख्य नियामक यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित दरानुसार, दहावी परीक्षेसाठी भाषा विषयाच्या प्रति उत्तरपत्रिकेसाठी ६.५० रुपये, तर बारावीला ७.५० रुपये मिळणार आहेत. इतर विषयांच्या उत्तरपत्रिकांसाठी दहावीला ४.५० रुपये आणि बारावीला ५.५० रुपये इतका मोबदला निश्चित करण्यात आला आहे.
सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. पुणे मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना उत्तरपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. सरासरी प्रत्येक परीक्षकाला २०० ते ३५० उत्तरपत्रिका मिळाल्या असून त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध विषयांच्या उत्तरपत्रिका समाविष्ट आहेत.