अमळनेरमध्ये अहिराणी साहित्य संमेलन: भाषेच्या समृद्धीचा जागर…

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर: अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी आणि समृद्धीच्या जागरासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन संमेलनाच्या प्रमुख सत्रांमध्ये करण्यात आले. अहिराणी ही समृद्ध आणि श्रीमंत भाषा असून, तिच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपला जातो, असे संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात रमेश सूर्यवंशी यांनी सांगितले.
या सत्राला धनदाई एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष के.डी. पाटील, अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष भगवान पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. फुला बागुल यांनी अहिराणीचा दोन हजार वर्षांचा इतिहास स्पष्ट केला. तसेच, अहिराणी भाषेला केंद्र आणि राज्य पातळीवर मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. जगदीश मोरे यांनी अहिराणी भाषेच्या शुद्ध-अशुद्धतेबाबत भाष्य करत अहिराणी ही भाषिक संपन्नतेचा वारसा जपणारी भाषा असल्याचे स्पष्ट केले. डॉ. बाळासाहेब गुंजाळ यांनी अहिराणी म्हणी, शब्दकोश आणि संस्कृतीवर आपले विचार मांडले, तर डॉ. कृष्णा पोतदार यांनी अहिराणीच्या उखाणे आणि म्हणींचे महत्त्व सांगत भाषेच्या सर्वांगीण आढाव्याचा ऊहापोह केला.
कार्यक्रमाचे पऱ्हेडकार डॉ. माणिक बागले होते, तर आभार डॉ. प्रशांत पाटील यांनी मानले.
अहिराणी कथाकथनाने रंगत
अहिराणी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी कथाकथन सत्र विशेष लक्षवेधी ठरले. “प्रत्येक नात्याला अर्थपूर्ण शब्द देणाऱ्या अहिराणीतील कथा घराघरात संदेश देतात,” असे अध्यक्षीय भाषणात एस.के. पाटील यांनी नमूद केले.
या सत्रात गोकुळ बागुल यांनी बट्ठा बाजार येडासना ही कथा सादर केली, जी माणसांच्या विचारशैलीवर विडंबन करणारी होती. प्राचार्य संजीव गिरासे यांनी काशीने जत्रा या कथेतून ग्रामीण साहेबराव नानांचे व्यक्तिचित्रण मांडले. लेखिका सौ. वृषाली खैरनार यांनी बजेट या कथेतून शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचे वास्तववादी चित्रण केले.
या सत्राचे सूत्रसंचालन प्रमोद चौधरी यांनी केले, तर आभार अशोक पाटील यांनी मानले. अहिराणी साहित्य संमेलनाने साहित्यप्रेमींसाठी वैचारिक आणि भाषिक समृद्धीचा उत्सव ठरल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.