अहिराणी भाषेच्या जतनासाठी अमळनेरमध्ये एकपात्री नाट्यप्रयोगाचा उत्सव..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर – भाषा हे संवादाचे माध्यम आहे, हुशारी दाखवण्याचे नव्हे, असे मत सुप्रसिद्ध एकपात्री नाटककार प्रविण माळी यांनी व्यक्त केले. त्यांनी दुपारच्या सत्रात अहिराणीतील विविध कला प्रकार सादर करत “आयत पोयत सख्यान” या नाट्याचा ४९६ वा एकपात्री प्रयोग सादर केला.
माळी यांनी खान्देश पट्ट्यातील विविध गावांमधील अहिराणी बोलीतील लकबी एकपात्री नाट्यातून सादर करत प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले. “आपल्या मायबोलीतील एक समृद्ध पान आपल्या लेकरांना द्यायलाच हवे”, असा संदेश त्यांनी या निमित्ताने दिला.
तसेच, सेवानिवृत्त तहसीलदार आणि अहिराणी सेवक सुदाम महाजन यांनी ‘अहिराणी मनी माय शे, डोक ठेवा तिने पाय शे’ या संदेशासह ‘अहिराणीना झटका’ सदरात बहारदार सादरीकरण केले. सुप्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट विलास शिरसाठ यांनी अहिराणी मिमिक्री सादर करत उपस्थितांना हसवले.
या कार्यक्रमाच्या मंचावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह दिनेश नाईक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन रणजित शिंदे यांनी मानले.