अमळनेरमध्ये संत सखाराम महाराज रथोत्सव उत्साहात संपन्न; सामाजिक एकात्मतेचे प्रतिक ठरला सोहळा..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर – अमळनेर नगरीतील संत सखाराम महाराज संस्थानचा वार्षिक रथोत्सव काल, दिनांक ८ मे रोजी, एकादशीच्या पावन दिवशी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. सायंकाळी सात वाजता श्रींच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली आणि त्यानंतर रथोत्सवास सुरुवात झाली.

रथात श्री लालर्जींची मूर्ती स्थापित करण्यात आली होती. परंपरेनुसार पहिली मोगरी लावण्याचा मान मुस्लिम बांधवांना देण्यात आला, ज्यामुळे सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडले. असंख्य भाविक रथ ओढण्यासाठी सहभागी झाले होते. रथाचा मार्ग ओहूर रख वाडी चौक, सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशी, मूल, पैलाडमार्ग असा होता. पहाटे ६ वाजेपर्यंत हा रथोत्सव चालू होता.
रथाच्या मागे प.पू. प्रसाद महाराज स्वतः अनवाणी पायी चालत होते. संपूर्ण खानदेशातून महिला व पुरुष भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या रथोत्सवाची महाराष्ट्रभर ख्याती आहे.
शुभारंभप्रसंगी प.पू. प्रसाद महाराज यांच्यासह भक्तराज महाराज (मुल्हेर), ईसरदास महाराज (नांदगाव), खासदार स्मिताताई वाघ, माजी नगराध्यक्ष सौ. जयश्री पाटील, विनोदभैय्या पाटील, डॉ. अनिल शिंदे, प्रांत अधिकारी नितीन मुंडावरे, डीवायएसपी विनायक कोते पाटील, पोलीस निरीक्षक केदार बारबोले, तहसीलदार दत्तात्रय निकम, रुपेश सुराणा (मुख्याधिकारी), भाजयुमो नेत्या भैरवी वाघ, योगेश महाजन, उदय देशपांडे, महेश कोठावदे, डीगंबर महाले, हरी भिका वाणी, दिलीप देशमुख, रवींद्र देशमुख, शितल देशमुख, प्रीतपाल बग्गा, गोपी कासार यांच्यासह पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रथोत्सव यशस्वीपणे पार पडण्यासाठी गावातील प्रत्येक समाजावर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. व्यायाम शाळेच्या लेझीम पथकांनी देखावा अधिक आकर्षक केला. अनेक मंडळांनी पाणी व थंड पेयांचे वाटप केले. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत सुरक्षेची खबरदारी घेतली.
यंदा भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रथ ओढण्यासाठी ट्रॅक्टरचाही वापर करण्यात आला. अखेर संपूर्ण रथोत्सव सर्वांच्या सहकार्याने शांततेत आणि भक्तीमय वातावरणात पार पडला.