चिमणपुरी पिंपळे येथे भेटीदरम्यान सीईओ मीनल करणवाल यांची कौतुकाची थाप..

24 प्राईम न्यूज 10 May 2025

अमळनेर तालुक्यातील पिंपळे खू गावात जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल मॅडम यांनी नुकतीच भेट देऊन ग्रामस्थ सेवा सहयोग संस्था, पाणी फाउंडेशन आणि धरती माता शेतकरी गटाच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू असलेल्या जल व मृदा संधारणाच्या नाला खोलीकरण कामाची पाहणी केली.

यावेळी विद्यार्थ्यांच्या अभ्यासशिकल्यालाही त्यांनी भेट दिली व “खूप छान उपक्रम आहे, विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळेल” असे म्हणत कौतुकाची थाप दिली. धरती माता गटाने जल व मृदा संरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती जाणून घेतली व लोकसहभागातून आणि संस्थांच्या मदतीतून सुरू असलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले.
ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांचे स्वागत लोकनियुक्त महिला सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अमळनेर तालुक्याचे गट विकास अधिकारी एन. आर. पाटील यांनीही पाहणी करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पिंपळे गावातील शेतकऱ्यांना मॉडेल शेत बनवण्यासाठी जलतारा, विहीर पुनर्भरण, बांधबंधिस्ती, फळबाग, गांडूळ खत, गोटा शेड अशा योजनांसाठी कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर तात्काळ मंजुरी देण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
कार्यक्रमात तंटामुक्त अध्यक्ष निंबा बापू चौधरी, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, पाणी फाउंडेशनचे सुनील पाटील, गुणवंत पाटील, सेवा सहयोग संस्थेचे अधिकारी सुरेश पाटील, ग्रामसेवक किरण लकेश, अंगणवाडी व आरोग्य सेविका, ग्रामरोजगार सेवक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.