आरसीबीच्या विजयाला काळी छाया : विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, ११ मृत, २५ जखमी

0

24 प्राईम न्यूज 5 Jun 2025
बंगळुरू : तब्बल १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर जल्लोषात स्वागत करण्यात आले. मात्र या विजयी सोहळ्याला दुर्दैवी कलंक लागला, कारण प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या दुर्घटनेमुळे विजयानंतरचा सत्कार सोहळा काही मिनिटांतच थांबवावा लागला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

मंगळवारी अहमदाबाद येथे झालेल्या आयपीएल अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्ज इलेव्हनचा पराभव करत पहिल्यांदाच आयपीएलचे जेतेपद मिळवले. या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठा सत्कार सोहळा आयोजित केला होता.

संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी हजारो चाहत्यांनी स्टेडियमच्या बाहेर गर्दी केली. विराट कोहलीसह आरसीबीच्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. पावसातही विधान सौध ते स्टेडियम या मार्गावर चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. मात्र, गर्दीचा ताण सहन न झाल्यामुळे काही ठिकाणी बॅरिकेड्स तुटले आणि अरुंद गेटमधून प्रवेश करण्याच्या घाईत चेंगराचेंगरी झाली.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. मात्र त्यामुळे गोंधळ वाढला आणि काही जणांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.

ही घटना सगळ्या देशाला हादरवणारी ठरली असून एका ऐतिहासिक विजयाचा जल्लोष शोकांतिका ठरल्याचे चित्र बंगळुरूमध्ये पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!