२१ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन; ‘ऑपरेशन सिंदूर’वर होणार चर्चा..

24 प्राईम न्यूज 5 जुन 2025

संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या २१ जुलैपासून सुरू होणार असून १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे, अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी दिली. या अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’ वरही चर्चा होणार आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याच्या पार्श्वभूमीवर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर दिले. या मोहिमेमुळे भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात विशेष सत्र घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, केंद्र सरकारने अद्याप अशा कोणत्याही विशेष सत्राचे संकेत दिलेले नाहीत.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामकाज समितीने अधिवेशनाच्या तारखांबाबत निर्णय घेतल्याची माहितीही रिजिजू यांनी दिली.