गोपनीय माहितीवरून कारवाई: अमळनेर पोलिसांकडून गावठी पिस्तूलसह एकजण अटकेत!

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर शहरात तरुणांमधील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर, दिनांक 05 जून 2025 रोजी अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. दत्तात्रय निकम यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मारवड रोडवरील क्रिडा संकुलच्या मागे एका इसमाकडे गावठी पिस्तूल आहे.

सदर माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक निकम यांनी पो.उप.नि. नामदेव बोरकर, पो.हे.कॉ. मिलिंद सोनार, पो.ना. सिद्धांत सिसोदे, पो.कॉ. निलेश मोरे व पो.कॉ. विनोद संदानशिव यांच्यासह त्या ठिकाणी झडप घातली. सायंकाळी 7:30 वाजता पोलिसांनी एका संशयित इसमाला पकडले, त्याचे नाव चेतन उर्फ सत्तु किरण धोबी (रा. शिवाजीनगर, पैलाड, अमळनेर) असे असल्याचे निष्पन्न झाले.

अंगझडतीदरम्यान त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळले. परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा (गु.र.नं. 225/2025) दाखल करण्यात आला असून आर्म्स अॅक्ट कलम 3, 25 अंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणी पिस्तूल किंवा अन्य शस्त्राचा वापर करून धमकी देत असेल तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. नागरिकांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. तसेच पालकांनी त्यांच्या मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे.
