पत्रकार सिद्धार्थ भोकरे यांना जीवे मारण्याची धमकी; अमळनेरमध्ये निषेध, पोलिसांकडे निवेदन..

आबिद शेख/अमळनेर

– महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना अज्ञात व्यक्तींकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर, अमळनेर शाखेतर्फे याचा तीव्र निषेध करत पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

सिद्धार्थ भोकरे यांनी ‘दैनिक जनप्रवास’ या वृत्तपत्रात पाकिस्तानातील क्रिकेटपटू जसे आपल्या देशावर प्रेम व्यक्त करतात, तसेच बॉलीवूडमधील खान बंधूंनी देखील भारतावरील प्रेम उघडपणे व्यक्त करावे, अशी भावना व्यक्त केली होती. या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना एका निनावी पत्राद्वारे “आठ दिवसात माफी माग, अन्यथा तुला गोळीबार करून उडवून टाकू” अशी धमकी मिळाली आहे.

या प्रकाराचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने निषेध करून, राज्य सरकारने याची गंभीर दखल घेऊन भोकरे यांना पोलिस संरक्षण द्यावे व धमकी देणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
अमळनेर येथील पत्रकार संघाच्या वतीने यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष समाधान मैराळे, जिल्हा सरचिटणीस सुरेश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष यदुवीर पाटील, प्रवीण बैसाणे, नूर खान, सुरेंद्र जैन, संघटक आत्माराम अहिरे, तालुका प्रसिद्धी प्रमुख गणेश चौहान आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार संघाने मुख्यमंत्र्यांकडे या गुन्हेगारांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, दिलेल्या निवेदनाची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.