फसवणुकीचा ‘गेम’; क्रिकेटपटूच्या जाहिरातीवर विश्वास ठेवून ३९ लाख गमावले.

0

24 प्राईम न्यूज 23 Jun 2025
ऑनलाइन गेमच्या आहारी गेलेल्या कोथरूडमधील एका तरुणाची तब्बल ३९ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. “जितका वेळ विमान हवेत उड्डाण करेल, तितके पॉइंट्स मिळतील” असा भास निर्माण करणाऱ्या गेममध्ये तो तरुण अडकला. लाखो रुपये सहज कमावता येतील या भूलथापांना भुलून त्याने गेममध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली, मात्र त्याचा शेवटी मोठा फटका बसला. विशेष म्हणजे या गेमची जाहिरात एका लोकप्रिय क्रिकेटपटूने केली होती, त्यामुळे गेमबद्दल विश्वास वाटून त्याने तो डाऊनलोड केला होता.

मोबाइलवर येणाऱ्या या गेमच्या जाहिराती अनेकदा कॅसिनो गेम किंवा क्रिकेट अॅपच्या स्वरूपात असतात. सुरुवातीला केवळ मनोरंजन किंवा थोडी कमाई या हेतूने खेळले जाणारे हे गेम हळूहळू व्यसनात रूपांतरित होतात. एकदा गुंतवणूक केल्यानंतर हरलेली रक्कम परत मिळवण्याच्या आशेने आणखी पैसे लावले जातात आणि शेवटी लाखो रुपये गमावल्यानंतरच भानावर येण्याची वेळ येते. मात्र, सर्व अटी स्वीकारून गेम डाऊनलोड केल्यामुळे फारच कमी लोक पोलिसांकडे तक्रार करतात.

या प्रकारात अनेकांनी मोठी कर्जं घेतली आहेत, आत्महत्येचे प्रयत्न झालेत, तर काहींनी गुन्हेगारी मार्ग पत्करले आहेत. गेमचे व्यसन लहान मुलांपासून युवकांपर्यंत सगळ्यांमध्ये वाढत असून त्यामुळे अभ्यास, नोकरी आणि वैयक्तिक आयुष्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. एकाकीपणा, नैराश्य आणि सामाजिक तुटवड्यांमुळे अनेकांचे आयुष्य अडचणीत आले आहे.

याशिवाय, या गेमद्वारे सायबर चोरटे बँक खात्यांमधून रक्कम चोरतात, पेमेंट अ‍ॅप्सवर नियंत्रण मिळवतात, तर काही स्कॅमर वैयक्तिक माहिती व क्रेडिट कार्ड डिटेल्स चोरून आर्थिक फसवणूक करतात. ऑनलाइन गेम हे सायबर गुन्हेगारांसाठी सहज आणि धोकादायक साधन बनले आहे. फिशिंग, मालवेअर, सोशल इंजिनिअरिंग अशा अनेक पद्धतींनी सामान्य नागरिकांना लक्ष्य केले जात आहे.

सतत वाढत असलेली ही समस्या पाहता, नागरिकांनी सावध राहणे, कोणतेही अज्ञात अ‍ॅप डाऊनलोड करताना काळजी घेणे आणि आर्थिक व्यवहार करताना खात्रीशीर प्लॅटफॉर्मचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!