८ तासांत खून प्रकरणाचा छडा – स्थानिक गुन्हे शाखा व फत्तेपुर पोलिसांची संयुक्त कारवाई..

0



कसवा पिंप्री ते पिंपळगाव चौखांवे रस्त्यावर सकाळी ७ वाजता एका अनोळखी पुरुषाचे प्रेत सापडल्याने खळबळ उडाली. तपासाअंती मृताची ओळख शुभम धनराज सुरळकर (रा. कसबा पिंप्री) अशी पटली. प्राथमिक तपासात प्रकरण घातपाताचे असल्याचे स्पष्ट झाले.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि फत्तेपुर पोलीस स्टेशनच्या पथकांनी तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर असे लक्षात आले की, खून इतरत्र होऊन मृतदेह येथे आणून फेकण्यात आला आहे.

गावात चौकशी दरम्यान मृत शुभमच्या घरातील वडील धनराज सुरळकर यांच्यावर संशय बळावला. चौकशीत त्यांनी कबुली दिली की, शुभम याच्या सततच्या दारूच्या व्यसनामुळे घरातील तणाव वाढल्याने त्यांनी डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्या दुसऱ्या मुलगा गौरव सुरळकर व भावाला हरीलाल सुरळकर यांना मदतीस बोलावले. तिघांनी मिळून मृतदेह चारचाकी वाहनातून पिंपळगाव रस्त्यावर नेऊन टाकला.

केवळ ८ तासांत गुन्हा उघडकीस आणत तीनही आरोपींना फत्तेपुर परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर भादंवि कलम ३०२ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदिप पाटील (स्थानिक गुन्हे शाखा) व फत्तेपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अं.पो.नि. अंकुश जाधव व त्यांच्या पथकांनी केली. पुढील तपास सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!