अपघात नव्हे, घातपातच! – माजी उपनगराध्यक्षाला ठार मारण्याचा प्रयत्न उघडकीस, तीन आरोपी जेरबंद.

जळगांव /प्रतिनिधी. – एरंडोल शहरात घडलेला कथित अपघात प्रत्यक्षात घातपातच असल्याचे समोर आले असून, स्थानिक गुन्हे शाखा जळगावने शिताफीने तपास करत तीन आरोपींना जेरबंद केले आहे. माजी उपनगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांना ठार मारण्याच्या उद्देशाने बनाव करून अपघात घडविण्यात आला होता, हे उघडकीस आले आहे.

माजी नगरसेविका कल्पना दशरथ महाजन (वय 41, रा. एरंडोल) यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात दिनांक 14 जून 2025 रोजी फिर्याद दिली होती. त्यांनी त्यांच्या नातेवाईक दशरथ महाजन यांच्यावरील “अपघात” संशयास्पद असल्याचे निदर्शनास आणून दिले. महाजन हे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष होते आणि त्यांचे अनेक राजकीय व्यक्तींशी मतभेद असल्याचेही सांगितले.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा जळगावकडे वर्ग करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके स्थापन करण्यात आली.
विजेच्या अडचणींमुळे सीसीटीव्ही तपासास काही प्रमाणात अडथळा आला, मात्र तपास पथकाने एका पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेज सातत्याने आठ तास पाहून आरोपींचा छडा लावला. पोहवा प्रविण मांडोळे व राहुल कोळी यांच्या चिकाटीने पुढे आलेल्या तपशीलातून अपघाताऐवजी घातपाताची खात्री पटली.
तपासात निष्पन्न झालेले आरोपी –
- उमेश ऊर्फ बदक सुरेश सुतार (वय 40)
- शुभम कैलास महाजन (वय 19)
- पवन कैलास महाजन (वय 20)
सर्व रा. एरंडोल, जि. जळगाव.
या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी उमेश सुतार याने हा गुन्हा पूर्व वैमनस्यातून केल्याचे मान्य केले. गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा बोलेरो चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.
सदर आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, अधिक तपासाद्वारे अन्य सहभाग असलेल्या व्यक्तींचा शोध घेणे सुरु आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. कविता नेरकर (अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव), व मा. विनायक कोते (उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपासकार्यात योगदान देणारे अधिकारी व कर्मचारी – श्री. संदीप पाटील, श्री. निलेश गायकवाड, शरद बागल, सोपान गोरे, हरीलाल पाटील, अक्रम शेख, संदीप पाटील, प्रविण भालेराव, रवि कापडणे, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, प्रशांत पाटील आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
📰 हा गुन्हा म्हणजे केवळ वैयक्तिक वैमनस्य नव्हे, तर राजकीय संघर्षाचा भीषण परिणाम असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपास अधिकच खोलात जात असून पुढील खुलास्यांची शक्यता नाकारता येत नाही.