अमळनेर तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई; किसान काँग्रेसचा उद्या गोडाऊनवर धडक मोर्चा.. . – प्रा. सुभाष पाटीलकार्याध्यक्ष किसान काँग्रेस, जळगाव

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर, जि. जळगाव – तालुक्यात तसेच जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आल्याचा गंभीर आरोप किसान काँग्रेसने केला आहे. खत विक्रेते, वितरक, कृषी विभाग तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या कथित भ्रष्ट युतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील यांनी म्हटले आहे.
व्यापारी मंडळी खताचे दर वाढण्याची वाट पाहत असून त्यांनी गोदामात साठवून ठेवलेले युरिया शेतकऱ्यांना विक्री करण्यास नकार दिला आहे. परिणामी, शेतकऱ्यांची लूट आणि अडवणूक होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक 30 जून 2025 रोजी जर विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून दिले नाही, तर मंगळवार दिनांक 1 जुलै 2025 रोजी किसान काँग्रेसकडून तालुक्यातील प्रत्येक युरिया गोडाऊनवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चादरम्यान गोडाऊनमधील युरिया शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी भाग पाडले जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
तसेच, सर्व खत विक्रेते, कृषी विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद कृषी विभाग व महसूल विभाग यांनी या गंभीर बाबीकडे तत्काळ लक्ष देऊन शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून द्यावे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात काळे फासण्याच्या आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.