रेल्वेचा मोठा निर्णय : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी तयार होणार रिझर्व्हेशन चार्ट!

24 प्राईम न्युज 30 Jun 2025

– भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने सादर केलेल्या नव्या प्रस्तावानुसार, आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधीच रिझर्व्हेशन चार्ट तयार केला जाणार आहे. सध्या हे चार्ट ट्रेन सुटण्याच्या केवळ ४ तास आधी तयार केले जातात.
या नव्या प्रस्तावामुळे दुपारी २ वाजण्याआधी निघणाऱ्या लांब पल्ल्याच्या ट्रेनसाठी रिझर्व्हेशन चार्ट आदल्या दिवशी रात्री ११ वाजेपर्यंत तयार केला जाणार आहे. यामुळे तिकीट कन्फर्म झाले की नाही, याबाबतची प्रवाशांची चिंता कमी होईल आणि प्रवासाची आखणी अधिक सुकर होईल.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच प्रवासी आरक्षण प्रणालीच्या अद्ययावतीकरणाचा आढावा घेतला आहे. हा प्रकल्प सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स (CRIS) मार्फत राबवला जात आहे.
नवीन प्रणालीद्वारे प्रत्येक मिनिटाला १.५ लाखांहून अधिक तिकिटांचे आरक्षण करणे शक्य होणार आहे. सध्या ही क्षमता फक्त ३२ हजार प्रति मिनिट इतकी आहे, त्यामुळे नवीन प्रणाली ही सध्याच्या तुलनेत जवळपास ५ पट अधिक कार्यक्षम ठरणार आहे.