वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून भावाकडून लाठ्याने मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..


आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर तालुक्यातील पैलाड भागातील सुरेश गोरख पाटील यांना त्यांच्या वडिलोपार्जित शेतीच्या वादातून भावाकडून मारहाणीचा सामना करावा लागल्याची घटना घडली आहे.
सुरेश पाटील हे चार भावांपैकी एक असून त्यांची अमळनेर शिवारातील गट क्रमांक 789 मध्ये 2 एकर 72 आर शेती आहे. मात्र, मोठा भाऊ राजेंद्र गोरख पाटील यांनी वडिलांची परस्पर सही घेऊन ही शेती आपल्या नावावर करून घेतल्याची तक्रार सुरेश पाटील यांनी केली असून याबाबत न्यायालयीन चौकशी सुरु आहे.
दि. 21 रोजी सुरेश पाटील हे त्यांच्या पत्नीसोबत शेतात गेले असता, तिथे त्यांच्या भावाने – राजेंद्र पाटील याने – पुतण्या गोरख पाटील व दीपक शिवराम पाटील यांच्यासह सुरेश पाटील यांना लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडणाच्या प्रसंगी सुरेश पाटील यांच्या पत्नीने मध्यस्थी करत भांडण थांबवले. मात्र सुरेश पाटील यांना गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेप्रकरणी राजेंद्र पाटील, गोरख पाटील आणि दीपक पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गणेश पाटील करीत आहेत.