टाकरखेडा परिसरातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत – नदी-नाले, तलाव कोरडेच; पिकांवर अळी-बुरशीचा प्रादुर्भाव..

आबिद शेख/अमळनेर

टाकरखेडा गाव तसेच परिसरात जून महिना संपूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे नदी, नाले आणि तलाव कोरडेच असून विहिरीतील पाणी दिवसेंदिवस घटत चालले आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांनी मे अखेरीस ठिंबक सिंचनाच्या आधारे काही ठिकाणी कपाशीची लागवड केली होती. उर्वरित लागवड व पेरण्या जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पार पडल्या. मात्र, पेरण्या केवळ रिपरिप पावसावर झाल्यामुळे पीक जेमतेम तग धरून आहे.
हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच मान्सूनही चार दिवस आधी दाखल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, प्रत्यक्षात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊसच झाला नाही आणि नंतरही दमदार सरी न पडल्याने पिकांची स्थिती बिकट झाली आहे.
सध्या जुलै महिना सुरू झाला असला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी, विहिरी भरायला उशीर होणार असून याचा परिणाम रब्बी हंगामावर होण्याची शक्यता आहे.
ढगाळ हवामानाचा प्रतिकूल परिणाम मका व कपाशी पिकांवर दिसून येत असून अळी आणि बुरशीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे फवारणीसाठी खर्च वाढत असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
विविध हवामान अंदाज खोटे ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये हवामान खात्याबद्दल नाराजी आहे. सध्या टाकरखेडा परिसरातील नदी, नाले, तलाव आणि विहिरी थेंबभरही न भरल्यामुळे शेतकरी वर्ग आकाशाकडे डोळे लावून दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहे.