अमळनेरात युरियाची कृत्रिम टंचाई — शिवसेनेचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुक्यात युरिया आणि इतर रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या अमळनेर तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
या निवेदनात खत विक्रेते दुकानदार, वितरक व संबंधित भरारी पथक यांनी संगनमताने बाजारात टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना जास्त दराने खत विकण्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आधीच दुष्काळग्रस्त असलेल्या अमळनेर तालुक्यातील बळीराजा अडचणीत सापडला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
सुरेश पाटील यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला विनंती केली की, अमळनेर तालुका शेतकी संघ व तालुका फूट सेल सोसायटीसारख्या सहकारी संस्थांना तात्काळ खताचा पुरवठा करण्यात यावा. तसेच खत दुकानदार, वितरक व गोडाऊनची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे.
या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह वरिष्ठ प्रशासनिक अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे.