अमळनेरात गुलालाची उधळण, पावसातही स्वच्छता अभियान राबविले

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर | शहरात नवव्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान भरपूर प्रमाणात गुलाल उधळला गेला. त्यामुळे रस्त्यांवर जणू गुलाबी चादर पसरल्यासारखे दृश्य निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेकडून मुसळधार पावसातही विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

ही स्वच्छता विशेषतः शुक्रवारी होणाऱ्या ईदच्या नमाजापूर्वी इस्लामपूर मशिदीसमोरील रस्त्यावर करण्यात आली, जिथे मोठ्या प्रमाणात गुलाल साचला होता. या मोहिमेचे मार्गदर्शन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केले.
अभियानात आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, संतोष माणिक, गौतम मोरे, नितीन बिरहाडे तसेच संबंधित वार्डातील सफाई कर्मचारी सक्रियपणे सहभागी झाले. मुसळधार पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीतही कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे स्वच्छतेचे काम पूर्ण करून एक सकारात्मक उदाहरण घालून दिले.